
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षांत अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामुळे ६०५ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे आणि सरकारी आकडेवारीनुसार, बाधित शेतकऱ्यांना ५४,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
राज्यात २०१९ पासून अतिवृष्टीत लक्षणीय वाढ झाली आहे, चालू खरीप हंगामात आधीच मोठे नुकसान झाले आहे, असे राज्य कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
शेती जमिनीवरील पिकांच्या नुकसानीचा एकूण आकडा ६०५.२६ लाख हेक्टर आहे. गेल्या नऊ वर्षांत काही क्षेत्रे किंवा गावे अनेक वेळा प्रभावित झाली आहेत हे देखील खरे आहे. गेल्या नऊ वर्षांत शेतकऱ्यांना देण्यात आलेली एकूण मदत ५४,६७९.१७ कोटी रुपये आहे, असे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतरच्या आढावा घेतलेल्या आकडेवारीनुसार, २०१६-१७ चा खरीप हंगाम वगळता दरवर्षी शेतकऱ्यांना कोणत्याना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
२०१५-१६ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या दोन घटनांसह दुष्काळी परिस्थितीमुळे ५६.५० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दुष्काळामुळे सर्वाधिक नुकसान झाले आणि २१ जिल्ह्यांना मोठा फटका बसला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील आर्थिक वर्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या दोन घटनांमुळे ६.८५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात, मार्च ते ऑक्टोबरदरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अनेक जिल्ह्यांना फटका बसला, ज्यामध्ये सात जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला. त्याच वर्षी, ४४.४३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, असे कृषी विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले. २०१८-१९ मध्ये अनेक आपत्ती आल्या. फेब्रुवारीमध्ये, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे १९ जिल्ह्यांमधील २.९१ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. एप्रिल-मेमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ७०,००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २६ जिल्ह्यांमधील दुष्काळामुळे ८५.७६ लाख हेक्टरवरील नुकसान झाले. त्यावर्षी जूनमध्ये १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १.८७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. जळगाव जिल्ह्यात वादळ आणि पावसामुळे २१ दिवसांत ८,००० हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या.
२०१९-२० मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीसह राज्याला क्यार आणि महा चक्रीवादळांचा सामना करावा लागला. चक्रीवादळामुळे ९६.५७ लाख हेक्टरवरील पिकांचे आणि बागांचे नुकसान झाले.
गेल्या आर्थिक वर्षात ६,६६०.५१ कोटींचे वाटप
सरकारी नोंदींनुसार २०१५-१६ मध्ये ४,१९०.६२ कोटी रुपये भरपाई देण्यात आली. त्यानंतर पुढच्या वर्षी ६०२.८३ कोटी रुपये, २०१७-१८ मध्ये ३,६२२.५० कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ६,२१८.३४ कोटी रुपये, २०१९-२० मध्ये ७,७५४.०६ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये ४,९२३.७८ कोटी रुपये, २०२१-२२ मध्ये ५,६४७.४४ कोटी रुपये, २०२२-२३ मध्ये ८,६३७.४४ कोटी रुपये, २०२३-२४ मध्ये ६,४२१.६३ कोटी रुपये आणि गेल्या आर्थिक वर्षात ६,६६०.५१ कोटी रुपये वाटप करण्यात आले.