

विजय गायकवाड
ज्येष्ठ पत्रकार व कृषी अभ्यासक
तुळजाभवानीच्या मंदिरापासून तीस-एक किलोमीटरवर करजखेडा गाव आहे. गावाच्या शिवारात सोयाबीन अजूनही उभे आहे. लांबून पाहिले तर पीक आहे असे वाटते. पण जवळ गेल्यावर दिसते की झाडे गुडघाभरही वाढलेली नाहीत. पाने पिवळी पडून गळून गेली आहेत. शेंग हातात घेऊन फोडली तर आत दाणाच नाही. ज्या शेंगांत दाणे आलेत, ते मोहरीएवढे बारीक आहेत. शेजारच्या लोअर तेरणा उपसा सिंचन योजनेच्या पात्रात पाणी नाही, फक्त भेगा आहेत. त्या भेगांमधून कुठेतरी तणाची चार हिरवी पाने डोकावतात, एवढीच काय ती हिरवळ.
जून-जुलैमध्ये पाऊस चांगला झाला. शेतकऱ्यांनी उमेदीने पेरणी केली, खते घातली, फवारण्या केल्या. पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यात असतानाच पावसाने दडी मारली. नेमक्या त्याच वेळी पाणी मिळाले नाही आणि हंगाम हातातून निसटला. आता पाऊस आला तरी काही वाचणार नाही, हे गावातले शेतकरी स्पष्ट सांगतात. फुले गळाली, शेंगा भरल्याच नाहीत. मग वाचवायचे काय?
१९७२ पेक्षा वाईट दिवस येण्याची भीती
जवळच्या काटी गावातही हीच स्थिती आहे. काहींनी शेत मोकळे करायला सुरुवात केली आहे. ज्यांनी कांद्याची लागवड केली होती, त्यांनाही आता तो खर्च वाया गेल्यासारखे वाटू लागले आहे. पीककर्ज, उधारीवर आणलेले बियाणे आणि खते, फवारणीचा खर्च असे सगळे डोक्यावर आहे. हातात मात्र काहीच नाही. १९७२ पेक्षा वाईट दिवस येतील की काय, अशी भीती जुनी-जाणती माणसे बोलून दाखवतात. हे चित्र एकट्या तुळजापूरचे नाही. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. मांजरा धरणात १ ऑक्टोबरला अवघा दहा टक्के साठा होता. गेल्या वर्षी याच दिवशी ते भरलेले होते.
पाऊस रुसल्याने रब्बीची पेरणी घटणार
खरा प्रश्न पुढच्या आठ महिन्यांचा आहे. खरीप गेल्याने गावातला पैसाच आटला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. ऊसतोडणी हा मराठवाड्याचा नेहमीचा आधार असतो. पण उसाचे उत्पादनही घटल्याने यंदा कारखान्यांचा हंगाम लहान असेल. त्यामुळे पुणे-मुंबईच्या बांधकामांकडे जाणाऱ्या ट्रक-टेम्पोंची गर्दी वाढेल. परतीचा पाऊस न आल्याने रब्बीची पेरणी घटणार आहे. डिसेंबरनंतर चाऱ्याचे दुर्भिक्ष्य जाणवेल आणि दुभती जनावरे बाजारात मिळेल त्या दराने विकली जातील. फेब्रुवारी-मार्चपासून टँकरच्या फेऱ्या आणि डोक्यावर हंडे घेतलेल्या बायकांची रांग, हे चित्र पुन्हा दिसेल. एप्रिल-मेमध्ये हे संकट शिगेला पोहोचेल.
महागाई वाढणार, स्वस्ताई विसरा...
याची झळ शहरालाही बसणार आहे. ऑगस्टमध्येच अन्नधान्याची महागाई सहा टक्क्यांजवळ पोहोचली होती आणि कांदा ४८ टक्क्यांनी महागला होता. ग्रामीण भागातील महागाई शहरापेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्याचे उत्पन्न गेले, त्याच्याच ताटावर आधी घाव बसतो आहे. सोयाबीन-मका कमी झाल्याने पशुखाद्य महागेल आणि दूध, अंडी, चिकनचे दरही चढतील. स्वस्ताईचे दिवस पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी विसरावे लागतील.
धरणातले पाणी आधी पिण्यासाठी राखीव
उपाय कागदावर तयार आहेत. धरणातले पाणी आधी पिण्यासाठी राखून ठेवणे, गाळपेर जमिनीवर आत्ताच चारा लागवड, पारदर्शक चारा छावण्या, गावातच मनरेगाची कामे, पीककर्जाचे पुनर्गठन, वीजजोडणी न तोडणे. प्रश्न आहे तो वेळेचा. पंचनामे होऊन मदत करजखेड्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचेपर्यंत त्याचा पुढचा हंगामही धोक्यात येऊ नये, एवढी काळजी सरकारने घ्यायला हवी.