

मुंबई : राज्यातील दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये अग्रीम जमा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. याआधी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यात आज आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याने एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि ‘ट्रिगर १’ आणि ‘ट्रिगर २’ या दोन्ही निकषांचा फेरआढावा घेतल्यानंतर आणखी ४० तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, या भागांतील शेतकऱ्यांना दुष्काळासाठी घोषित केलेल्या १२ सवलतींचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफी प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. नव्याने साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यात आली असून, या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. तसेच दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या हातात पैसे असावेत आणि त्यांना कुटुंबाचा खर्च भागवता यावा, या उद्देशाने मंत्रिमंडळाने त्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हमीभावाने चारा खरेदी
राज्याच्या काही भागांत केवळ ९० दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी चारा पिकविल्यास तो हमीभावाने खरेदी करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मायक्रोफायनान्स संस्थांनीही बळजबरीची वसुली करू नये
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, असे निर्देश जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांना दिले आहेत. शासन निर्णयातील अटींमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंत्रिमंडळाने त्या अटी काढून टाकून निर्णय सर्वांना लागू केला आहे. खासगी मायक्रोफायनान्स संस्थांनीही बळजबरीची वसुली करू नये, यासाठी चर्चा केली जाणार आहे. वीजबिल वसुलीसाठीही शेतकऱ्यांना तगादा लावू नये, असे स्पष्ट करत नियमबाह्य वसुली झाल्यास कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.
दुष्काळ जाहीर झालेले जिल्हानिहाय ३९ तालुके
नाशिक : चांदवड, त्र्यंबकेश्वर, निफाड
पुणे : आंबेगाव, जुन्नर
सातारा : पाटण, जावळी, कराड, कोरेगाव, वाई
कोल्हापूर : शाहूवाडी, शिरोळ
सांगली : खानापूर, पलूस, वाळवा, कडेगाव, तासगाव
भंडारा : मोहड, तुममर
गोंदिया : अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, गोंदिया, तिरोडा
चंद्रपूर : बल्लारपूर, जिवती , ब्रह्मपुरी
नांदेड : मुदखेड आणि मुखेड
वर्धा : कारंजा
पालघर : जव्हार, मोखाडा , तलासरी
रत्नागिरी : लांजा, मंडणगड, खेड
पाणीटंचाईवर कठोर उपाययोजना
मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागांत टँकरची मागणी वाढत असून, तेथे पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा जास्त खाली गेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेवढे टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. टँकरच्या वाहतुकीवर जीपीएसद्वारे देखरेख ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे १६ हजार अनधिकृत पाणी जोडण्या तोडल्या असून, यापुढेही अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांना २ हजार रुपयांची भाऊबीज भेट
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी दिली.राज्यात १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २ लाख १४ हजार ९७ पदे आहेत. या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.