बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे.
बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
Freepik
Published on

मुंबई : बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीर सारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

पनीर हा खाद्य पदार्थातील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ऍनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येत आहे. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, तसेच २०११ आणि २०२२ मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज अॅनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासून, पनीरच्या ऐवजी अॅनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यास, कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायद्यातील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाईल, असा इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

पोषणमूल्याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक

अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) २०२० च्या नियमांनुसार, विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.

चुकीला माफी नाही

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला माफ केले जाणार नसून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in