

मुंबई : शाळांच्या परिसरात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७९ खाद्यपदार्थ आस्थापनांचे कामकाज महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बंद केले आहे, तर २१ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित केली आहे. १ एप्रिल ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ‘एफडीए’च्या मुंबई विभागाने दोन शाळांची तपासणी करून दोन खाद्यपदार्थ आस्थापनांचे कामकाज बंद पाडले.
महाराष्ट्रात ४२२ शाळांची तपासणी करण्यात आली. शाळांच्या आवारापासून ५० मीटरच्या परिघात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ आस्थापना आढळून आल्या. त्यापैकी ६९ आस्थापनांचे कामकाज थांबवण्यात आले आणि १९ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली.
विद्यापीठातील कँटीनला दंड
विद्यापीठे, महाविद्यालये आणि वसतिगृहांमधील कँटीन, खाणावळी, भोजनालये आणि फूड कोर्ट यांना वैध ‘एफएसएसएआय’ नोंदणी किंवा परवाना घेणे व परिशिष्ट-४ मधील स्वच्छतेच्या अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘एफडीए’ने नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील कँटीनची तपासणी केली असता तेथे वैध नोंदणी किंवा परवाना नसल्याचे तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या अनेक त्रुटी आढळल्या. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शिक्षकांसाठी जनजागृती कार्यशाळा
नियमभंग केल्यास सुधारणा नोटीस, परवाना निलंबन आणि परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा ‘एफडीए’ने दिला आहे. अस्वच्छ वातावरणात अन्न तयार केल्यास १ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो, तर अनिवार्य परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. या कालावधीत ६२,८२८ शाळांमधील ६९,६८७ शिक्षकांसाठी २८८ जनजागृती कार्यशाळा घेण्यात आल्या.
कोकण विभागात सर्वाधिक नियमभंग
मुंबईत ‘एफडीए’ने दोन शाळांची पाहणी करून प्रतिबंधित ५० मीटर क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन खाद्यपदार्थ आस्थापना बंद केल्या. या मोहिमेत कोकण विभागात सर्वाधिक नियमभंग नोंदवले गेले असून तेथे प्रतिबंधित क्षेत्रात ६४ आस्थापना सुरू असल्याचे आढळले. यापैकी २७ आस्थापनांचे कामकाज बंद करण्यात आले आणि एकाचा परवाना निलंबित करण्यात आला.