

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत हेल्थ सप्लिमेंट तसेच गुटखा आणि सुगंधित तंबाखूसह १ कोटी ९० लाख रुपये मूल्याचे अन्नपदार्थ जप्त केले आहेत. मुंबईतील दहिसर, धारावी, गोरेगाव आणि अँटॉप हिल परिसरातील सहा पानटपऱ्यांवरून ३१ हजार १४९ रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आला असून राज्यभरात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा
बडगा उगारण्यात आला आहे. एफडीएने १३ नोव्हेंबरला राज्यभरातील उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांच्या आस्थापनांवर केलेल्या तपासणी मोहिमेत १ कोटी ३८ लाख रुपये मूल्याचे आरोग्य पूरक आहार आणि न्यूट्रॅस्युटिकल्स जप्त केले. विशेष आहारासाठी तयार करण्यात आलेल्या या खाद्यपदार्थांमध्ये मॅग्नेशियम अॅसिटाईल तौरेंट आणि निकोटिनामाइड मोनोन्युक्लियोटाइड (एनएमएन) या घटकांचा समावेश असल्याचे निदर्शनाला आले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने या घटकांच्या उत्पादन मंजुरीसाठी केलेले अर्ज या आधीच फेटाळले होते.
परवान्यात अन्न श्रेणीचा समावेश नाही
ही धडक कारवाई पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांमध्ये राबवण्यात आली. यामध्ये नागपूर विभागात ५७ लाख ३० हजार रुपयांचा सर्वाधिक साठा जप्त करण्यात आला, तर कोकणात ४७ लाख ६५ हजार रुपये आणि पुण्यात ३० लाख ५७ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. उत्पादकांनी आवश्यक उत्पादन मंजुरी न घेताच या सप्लिमेंट्सचे उत्पादन केल्याचे आणि काही विक्रेत्यांनी परवान्यात अन्न श्रेणीचा समावेश न करताच विक्री केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पाच गुन्हे दाखल
मुंबईत जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पदार्थांमध्ये गुटखा, पान मसाला, सुवासिक तंबाखू आणि सुवासिक सुपारीचा समावेश आहे. दहिसर पूर्वेकडील दोन दुकानांतून ३ हजार १२४ रुपये, धारावीतील दोन दुकानांतून १८ हजार ६६० रुपये, गोरेगावमधील एका दुकानातून ५ हजार ३४० रुपये आणि अॅटॉप हिलमधील एका दुकानातून ४ हजार २५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुण्यात ३ लाख ९२ हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि २ लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले असून, एकूण ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी सात आरोपींवर पाच गुन्हे दाखल केले आहेत.