कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबवा! महाराष्ट्र FDA चे आवाहन

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही मुलांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या कोल्ड्रिफ सिरपमुळे चिंता वाढली असून, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी या औषधाच्या एका विशिष्ट बॅचचा वापर किंवा विक्री त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.
कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबवा! महाराष्ट्र FDA चे आवाहन
Published on

मुंबई : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही मुलांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या कोल्ड्रिफ सिरपमुळे चिंता वाढली असून, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी या औषधाच्या एका विशिष्ट बॅचचा वापर किंवा विक्री त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.

तमिळनाडू औषध नियंत्रण प्राधिकरणाने २ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे की, श्रीसन फार्मास्युटिकल्स, कांचीपूरम यांनी तयार केलेल्या कोल्ड्रिफ सिरप (बॅच नं. एसआर- १३; उत्पादन तारीख : मे २०२५; समाप्ती : एप्रिल २०२७) च्या नमुन्यात डायथिलीन ग्लायकोल (४८.६% डब्ल्यू/व्ही) हे विषारी रसायन आढळले असून, त्यामुळे औषध आरोग्यास हानीकारक ठरू शकते.

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात या खोकल्याच्या सिरपच्या सेवनामुळे १४ मुलांचा संशयास्पद मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नागरिकांनी सावध राहावे व कोल्ड्रिफ सिरपचा बॅच क्रमांक एसआर - १३ असल्यास ते तातडीने जवळच्या औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे द्यावे, असे महाराष्ट्र एफडीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन मिसळले गेले असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला आहे.

तातडीने साठा गोठवण्याचे आदेश!

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी संबंधित बॅच महाराष्ट्रात कुठे वितरित झाली आहे हे शोधण्यासाठी तमिळनाडू औषध नियंत्रण प्रशासनाशी समन्वय साधला आहे. सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्तांना चिट्ठी पाठवून किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी व रुग्णालयांना तातडीने साठा गोठवण्याचे आदेश दिले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in