महाराष्ट्रात जनावरांचे पहिले 'ब्युटी पार्लर'; लोकसहभागातून 'या' ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

शासनाच्या माध्यमातून घनकचरा आणि सांडपाण्यावर मोठी यंत्रणा राबवली जाते. मात्र ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याकडे असलेल्या पाळीव जनावरांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणावर अपेक्षित काम होत नाही. यामुळे येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात असलेल्या पाळीव प्राण्यांसाठी...
महाराष्ट्रात जनावरांचे पहिले 'ब्युटी पार्लर'; लोकसहभागातून 'या' ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम
Published on

सातारा: महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ८२ पुरस्कार मिळवलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत, आता पुन्हा एकदा नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत आली आहे, मान्याचीवाडीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच जनावरांसाठी ‘ब्युटी पार्लर’ म्हणजेच अत्याधुनिक स्नानगृह सुरू केले आहे. नदी-ओढ्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी उचललेले हे पाऊल सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरते आहे.

गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गावातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळाला आहे. आता या ग्रामपंचायतीने जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

शासनाच्या माध्यमातून घनकचरा आणि सांडपाण्यावर मोठी यंत्रणा राबवली जाते. मात्र ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याकडे असलेल्या पाळीव जनावरांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणावर अपेक्षित काम होत नाही. यामुळे येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात असलेल्या पाळीव प्राण्यांसाठी स्नानगृहाची उभारणी केली आहे. गावातील पाळीव जनावरांमुळे नदी-ओढ्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा अभिनव प्रयोग राबवण्यात आला आहे.

हे स्नानगृह अत्यंत सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त आहे. यात शॉवर, स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशा सुविधा उपलब्ध आहेत. 'शासनाकडून नेहमीच सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपक्रम राबविले जातात. मात्र जनावरांना धुण्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत कोठेच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. मात्र आमच्या या उपक्रमामुळे या प्रदूषणाला चाप बसेल', असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in