परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला; देवेंद्र फडणवीसांनी सादर केली आकडेवारी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत मागे गेला होता, तो आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणल्याचेही ते म्हणाले.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला; देवेंद्र फडणवीसांनी सादर केली आकडेवारी

विरोधकांकडून नेहमीच महाराष्ट्रातील उद्योग-धंदे, नवीन प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप केला जातो. असे असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट आकडेवारी सादर करत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रिक गुंतवणुकीपेक्षा जास्त परकीय गुंतवणुक महाराष्ट्रात आली असल्याचे सांगत, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर १ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात महाराष्ट्रात 1 लाख 83 हजार 924 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली असून, परकीय गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती दिली असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत मागे गेला होता, तो आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणल्याचेही ते म्हणाले.

राज्यात 2022-23 या आर्थिक वर्षात 1, 18, 442 कोटींची परकीय गुंतवणूक करुन राज्य परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले. 2023-24 च्या पहिल्या तीन महिन्यात(एप्रिल ते जून 2023) राज्यात 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली. 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर 2023) 28, 868 कोटींची थेट परकीय गुंतवणूक करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले, असे फडणवीस यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in