
मुंबई: शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली आहे. डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले आहेत. या वर्षीच्या आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात १ लाख ५८ हजार सौर पंप बसविण्यात आले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घकाळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौरऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौरऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमयदित सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात २६ तारखेपर्यंत २१ हजार ९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून दररोज सरासरी ८४४ पंप बसविण्यात आले. ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे.
राज्यात २०१५ पासून २०२३ पर्यंत विविध योजनेत १ लाख ८० हजार सौर पंप बसविण्यात आले होते. या वर्षी मार्च २०२४ पासून आतापर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात १ लाख ५८ हजार सौर पंप बसविण्यात आले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे.
शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो.