आरोग्य संस्थांवर AI ची नजर; कोल्हापुरात राज्यातील पहिला आरोग्य प्रकल्प, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

सार्वजनिक आरोग्य संस्था मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरोग्य संस्थांवर एआयची नजर असणार आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर(Photo- X)
Published on: 

मुंबई : सार्वजनिक आरोग्य संस्था मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरोग्य संस्थांवर एआयची नजर असणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आकाराला येणाऱ्या या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन सोमवारी रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष वापर करणारा हा राज्यातील पहिला जिल्हास्तरीय प्रकल्प ठरणार आहे. आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने तसेच आयआयटी मंडीच्या सहकार्याने याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख

या प्रणालीद्वारे रुग्णालयांमधील डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची गर्दी, रांग व्यवस्थापन, स्वच्छता, हाऊसकीपिंग तसेच आपत्कालीन घटनांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. एखादा रुग्ण अचानक कोसळणे, रुग्णालय परिसरात आग लागणे किंवा धूर निर्माण होणे यांसारख्या घटनांची प्रणाली तत्काळ ओळख करून संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट पाठवेल. तसेच बाह्यरुग्ण विभागातील गर्दी, प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि सरासरी प्रतीक्षा वेळ यांचेही विश्लेषण केले जाणार आहे.

तंत्रज्ञानाद्वारे फुटेजचे विश्लेषण

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता नाही. आरोग्य संस्थांमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचाच वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे फुटेजचे विश्लेषण केले जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून आरोग्य व्यवस्थेचे तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन करता येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)