महाराष्ट्रात चालते फिरते 'क्राईम पेट्रोल'! गुन्हा सिद्ध करणारी 'मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन'; महाराष्ट्रातील पहिल्याच व्हॅनचे लोकार्पण

क्राईम सीन ॲप्लिकेशन अद्ययावत करणे, घटनास्थळी फाॅरेन्सिक पथक धडकणार, घटना स्थळावरील पुरावे फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून एकत्रित करणे, रक्त , डीएनए बलात्काराच्या गुन्ह्यातील पुरावा संकलित होणार यासाठी 'मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन' महत्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्रात चालते फिरते 'क्राईम पेट्रोल'! गुन्हा सिद्ध करणारी 'मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन'; महाराष्ट्रातील पहिल्याच व्हॅनचे लोकार्पण
एक्स @CMOMaharashtra
Published on

मुंबई : क्राईम सीन ॲप्लिकेशन अद्ययावत करणे, घटनास्थळी फाॅरेन्सिक पथक धडकणार, घटना स्थळावरील पुरावे फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून एकत्रित करणे, रक्त , डीएनए बलात्काराच्या गुन्ह्यातील पुरावा संकलित होणार यासाठी 'मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन' महत्वपूर्ण ठरणार आहे. गुन्हा सिद्ध करण्यासाठी 'मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन' चा वापर करणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

सह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून  क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बार कोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये  फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

या व्हॅनमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहे. वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील.  तसेच स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत. तसेच व्हॅन सीसीटीव्हीने सज्ज असून कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला सबंधित गुन्ह्या संदर्भात गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे. ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करून  आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार असून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला राज्यमंत्री गृह (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,  मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  प्रधान सचिव राधिका रस्तोगी, प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, महासंचालक (न्याय व तांत्रिक) संजय वर्मा, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा  संचालनालय संचालक डॉ. संगीता घुमटकर, उपसचिव राजेंद्र  भालवणे, गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पार पाडणार जबाबदारी

जेव्हा गुन्हा नोंदविला जातो, तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देवून ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन  ॲप्लिकेशन मध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले करतील. त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.

कायद्याची अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री

मुंबई : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना शुद्ध दूध मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. दूधात भेसळ खपवून घेणार नाही, भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुग्ध विकास विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. दरम्यान, भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग व दुग्ध विकास विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.  मुख्यमंत्री म्हणाले की, सीएसआरमधून दूध उत्पादकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या माध्यमातून राज्यातील दुधाची उपलब्धता वाढवण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in