
मुंबई : वीज बिलात सवलत, किसान क्रेडिट कार्ड, शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना कर सवलत अशा विविध योजनांचा लाभ आता मच्छिमारांना मिळणार आहे. मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे बोलत होते. मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्यासारख्या योजना, विनाव्याज कर्ज, नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसानभरपाई, तसेच इतर शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजना लागू होणार आहेत. मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होणार आहे. राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. राज्यातील मत्स्य व्यवसाय अधिक शाश्वत आणि फायदेशीर व्हावा, तसेच मच्छीमार समाजाचा आर्थिक स्तर उंचावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मत्स्य व्यावसायिकांना अनुदान मिळणार
कृषी क्षेत्रास लागणारे बियाणे, ट्रॅक्टर, अवजारे, खते इत्यादीकरिता शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅडलव्हील एअरेटर्स, एअरपंपकरिता आता अनुदान मिळणार आहे. शीतगृह व बर्फ कारखान्याला अनुदान, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विमाप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना, मत्स्य संवर्धकांना मत्स्यबीजांच्या मत्स्योउत्पादनाच्या नुकसानीसाठी मत्स्य विमा योजना, दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यास कृषी क्षेत्रात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासनातर्फे ‘रिलीफ पॅकेज’ जाहीर होते, त्याचप्रमाणे मच्छीमारांनाही शासनातर्फे ‘रिलीफ पॅकेज’ मिळणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.
असा होणार फायदा
मत्स्यपालनाला कृषीचा दर्जा मिळाल्याने किनारी आणि अंतर्गत भागाचा आर्थिक विकास होणार आहे. याचबरोबर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच मच्छीमारांना वीज शुल्कात अनुदान मिळणार आहे. मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प, संबंधित कारखाने, प्रक्रिया युनिट यांना कृषी दराने वीज मिळणार आहे. मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.