राज्यातील पाच समुद्रकिनारे होणार चकाचक; कायमस्वरूपी ‘ब्लू-फ्लॅग’ दर्जासाठी प्रयत्न; २० कोटींचा निधी मंजूर

राज्यातील ५ समुद्रकिनारे स्वच्छ व चकाचक होणार आहेत. समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यटन विभागाने मोठी झेप घेतली आहे. या उपक्रमामुळे किनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना मिळणार असून, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर या किनाऱ्यांना नवी ओळख मिळणार आहे.
राज्यातील पाच समुद्रकिनारे होणार चकाचक; कायमस्वरूपी ‘ब्लू-फ्लॅग’ दर्जासाठी प्रयत्न; २० कोटींचा निधी मंजूर
राज्यातील पाच समुद्रकिनारे होणार चकाचक; कायमस्वरूपी ‘ब्लू-फ्लॅग’ दर्जासाठी प्रयत्न; २० कोटींचा निधी मंजूर
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ५ समुद्रकिनारे स्वच्छ व चकाचक होणार आहेत. समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यटन विभागाने मोठी झेप घेतली आहे. डहाणू (पालघर) येथील पर्णका, रायगडमधील श्रीवर्धन व नागाव (अलिबाग), तसेच रत्नागिरीतील गुहागर व लाडघर या पाच किनाऱ्यांवर दर्जेदार सुविधा उभारून ‘ब्लू-फ्लॅग’ प्रमाणपत्र कायमस्वरूपी मिळविण्यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी ७ कोटी रुपयांचा निधी पर्यटन संचालनालयास तत्काळ वितरित करण्यात आला आहे.

फाऊंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (एफईई), डेन्मार्क या संस्थेकडून सुरक्षा, पाणी गुणवत्ता आणि पर्यावरण शिक्षणाचे निकष पूर्ण करणाऱ्या किनाऱ्यांना ‘ब्लू-फ्लॅग’ दर्जा प्रदान केला जातो. महाराष्ट्रातील या पाच किनाऱ्यांना आधी प्रायोगिक स्वरूपात हा दर्जा मिळाला होता. आता कायमस्वरूपी प्रमाणपत्रासाठी पर्यटन व पर्यावरण विभाग संयुक्तपणे काम करत आहेत.

पर्यटन विभागामार्फत या किनाऱ्यांवर प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, पार्किंग, चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती दुकाने, डस्टबिन, लाइफगार्ड टॉवर, सोलार लाईट, दिशादर्शक फलक, कचरा व्यवस्थापन, सुरक्षारक्षक आणि पोहोच रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. कामांची गुणवत्ता राखण्यासाठी थीम-आधारित स्थापत्यविशारदांच्या मार्गदर्शनाखाली नामांकित कंत्राटदारांकडून ही कामे केली जाणार आहेत. सर्व प्रकल्प तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच निधीचा पारदर्शक वापर, वित्तीय नियमांचे पालन, तांत्रिक मान्यता आणि कामाच्या प्रगतीचा मासिक अहवाल शासनास सादर करणे अनिवार्य आहे.

समुद्रकिनाऱ्यांना नवी ओळख मिळणार

उपक्रमामुळे किनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना मिळणार असून, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर या किनाऱ्यांना नवी ओळख मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in