पूर रेषेवर उपग्रहाद्वारे मॅपिंग; यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्री फडणवीस

पूर रेषेवर उपग्रहाद्वारे मॅपिंग; यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्री फडणवीस

यंदा वेळेआधीच मान्सूनची एंट्री महाराष्ट्रात झाली आणि राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावेळी लोकांच्या मदतीसाठी संबंधित यंत्रणा सज्ज आहेत.
Published on

मुंबई : यंदा वेळेआधीच मान्सूनची एंट्री महाराष्ट्रात झाली आणि राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावेळी लोकांच्या मदतीसाठी संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. पूर रेषेच्या आत अतिक्रमण होणार नाही यासाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करा, विशेषतः कोकणात भूमिगत विद्युत वाहिनीचे जाळे विस्तारा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

सह्याद्री अतिथीगृहात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

आपत्तीमध्ये जीवित व वित्त हानी सोबतच पायाभूत सोयी - सुविधांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, आपत्तीमध्ये सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना आपत्तीची झळ बसू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनात दर्जेदार काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा निधी सौम्यीकरण कामासाठी खर्च व्हावा. तसेच पावसानंतर नुकसान झालेले रस्ते, बंधारे, वीज वाहिन्या दुरुस्ती कामासाठीसुद्धा या निधीचा उपयोग करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, पूर रेषा केवळ खूण म्हणून न ओळखता पूर रेषेच्या आत अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठीचे सर्व्हेक्षण करताना अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करावे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. कोकण आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत घेण्यात येत असलेल्या भूमिगत वीज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधले आसरे बांधणे, दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि वीज अडथळ्याची कामे गतीने करावीत.

‘आपदा मित्रां’ना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांचा डाटाबेस तयार करावा. ‘आपदा मित्रां’ना ओळखपत्र देण्यात यावे, अशा सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येणाऱ्या प्रत्येक आपत्तीला सामोरे जाताना मागील परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार अचूक नियोजनद्वारे अंमलबजावणी करावी. आपत्तीसंदर्भात सर्वंकष अभ्यास करून ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापनाचे कीट उपलब्ध करून द्यावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

नदीतील गाळ उपसा वेळीच करा!

नद्यांची वहन क्षमता वाढवण्यासाठी नदी स्वच्छ करून नदीतील गाळ काढणे, राडारोडा काढणे आवश्यक आहे. या कामास जलसंपदा विभागाने प्राधान्य द्यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बैठकीत महाबळेश्वर व पाचगणी येथील विद्युत वाहिन्या भूमिगत करून वादळ वाऱ्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

logo
marathi.freepressjournal.in