पूरग्रस्तांना भरीव मदत द्या! मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

मुसळधार पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
पूरग्रस्तांना भरीव मदत द्या! मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
Photo : X (@Dev_Fadnavis)
Published on

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भात आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले असून हजारो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पूरग्रस्तांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेऊन केली.

राज्यातील पूरस्थिती गंभीर असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींसोबत शुक्रवारी तासभर चर्चा केली. मराठवाड्यात झालेल्या नुकसानीनंतर राज्याला मदत करण्यासंदर्भात ही चर्चा झाली. फडणवीस यांनी नुकसानीची सविस्तर माहिती पंतप्रधानांना दिली आणि ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून भरीव मदतीची विनंती केली. पंतप्रधानांनी मदतीबाबत सकारात्मकता दाखवली असून लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या. तो प्रस्ताव आला की आम्ही त्यावर कार्यवाही करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, ती मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा उल्लेख केला होता. ही कर्जमाफी कशी परिणामकारक होईल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता नक्कीच करू. यासंदर्भात एक समिती स्थापन केली आहे. तीच कर्जमाफीबाबतचा निर्णय घेईल. कर्जमाफी वारंवार केली जाऊ शकत नाही, त्यामुळे ती अधिक प्रभावी कशी होईल यावर लक्ष दिले जाईल.

खरीप पिकासाठी घेतलेली कर्जे पुढील वर्षी परतफेड करावी लागतील. सध्या शेतकऱ्यांची तातडीची गरज म्हणजे त्यांच्या खात्यात थेट मदत मिळणे. त्यामुळे हे आमचे प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पूरामुळे झालेल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारला त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ व ९ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in