फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा

दहशतवादविरोधी यंत्रणेचा समन्वय प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा दलातील विशेष कमांडो पथक असलेल्या 'फोर्स वन'चे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण आता दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात येणार आहे.
फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा
फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : दहशतवादविरोधी यंत्रणेचा समन्वय प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा दलातील विशेष कमांडो पथक असलेल्या 'फोर्स वन'चे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण आता दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यापासून ते प्रत्यक्ष दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यापर्यंतच्या कामकाजासाठी एकसंध नेतृत्व उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जोखमीच्या दहशतवादी घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी शस्त्रसज्ज, विशेष प्रशिक्षणप्राप्त कमांडो दल म्हणून फोर्स वनची स्थापना करण्यात आली, तर दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करणे, गुप्त माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे, दहशतवादी संघटनांविरोधात कायदेशीर कारवाई व तपास करण्याची जबाबदारी एटीएसकडे आहे.

दोन्ही पथकांमध्ये समन्वय

नव्या निर्णयानुसार एटीएसच्या अधिपत्याखाली फोर्स वनचे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण राहणार आहे. त्यानुसार दहशतवादविरोधी कारवायांचे एकात्मिक नियोजन, गुप्त माहितीच्या आधारे कारवाईचे समन्वयन, दहशतवादी हल्ल्याच्या वेळी फोर्स वनला पाचारण करणे, कमांडो कारवाईचे नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये एटीएसच्या नेतृत्वाखाली समन्वय साधला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये बदल नाही

या नियंत्रण हस्तांतरणामुळे फोर्स वनच्या विद्यमान पदसंरचनेत, मनुष्यबळात, आर्थिक तरतुदीत किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवा-अटींमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांना आवश्यक प्रशासकीय आदेश काढून नियंत्रण हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)