
मुंबई : महाराष्ट्र राज्यात परकीय गुंतवणुकीचे घोडदौड सुरू असून श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी तब्बल १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत सुमारे ३३,७६८.८९ कोटी रुपये असून, त्यातून राज्यात सुमारे ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.
उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा जीवनचक्र राज्य सरकारने स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कमी वीजदराचा उद्योगांना मिळणार दिलासा
ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, "राज्यात नुकताच ५ वर्षांचा मल्टी-इयर टैरिफ मंजूर झाला असून, वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर ९ टक्क्यांनी वाढत असत, पण आता विजेचे दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार आहे.