‘असा’ होता मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास

मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकी मागून कुटुंबाला हातभार लावला.
‘असा’ होता मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास

बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं २३ फेब्रुवारी रोजी निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. राज्यात आणि केंद्रात अनेक पदे भूषवणाऱ्या शिवसेनेच्या जोशी सरांचं आयुष्य संघर्षमय राहिलं. रायगड जिल्ह्यातील छोट्याशा गावात जन्मलेले मनोहर जोशी यांचा मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा होता, हे बघूयात.

मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकी मागून कुटुंबाला हातभार लावला.

शिक्षण

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं चौथीपर्यंतचं शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था महाजन बाईंकडे होती. पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर कीर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.

उदरनिर्वाहासाठी नोकरी

- शिक्षण सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम सुरू केले. पुढे वयाच्या २७व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली.

- 'शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी मिळवली होती. पुढे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती.

कोहिनूर इन्स्टिट्यूटची मुहूर्तमेढ

मनोहर जोशी यांचं १९६४ मध्ये अनघा यांच्याबरोबर विवाह झाला. एक मुलगा आणि दोन मुली असं त्यांचं कुटुंब आहे.मनोहर जोशी यांचा पिंड व्यावसायिकाचा होता. दूध, फटाके विक्री, हस्तीदंती वस्तूंची विक्री असे व्यवसाय त्यांनी केले. त्यातील काही बुडाले. पुढे २ डिसेंबर १९६१ मध्ये नोकरी सोडून त्यांनी कोहिनूर या नावाने क्लासेस व्यवसाय सुरू केला. याचेच पुढे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट झाले. त्याच्या भारतात ७० शाखा आहेत.

मनोहर जोशी आणि शिवसेना

- बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले. १९६७ पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले.

- नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे १९७६ मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पावले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढे ते १९९०-९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

- महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. ते १९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला.

केंद्रात मंत्री, लोकसभा अध्यक्ष

मनोहर जोशी राज्याच्या राजकारणातून नंतर केंद्रात गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री बनले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. २००६ ते २०१२ या काळात खासदार असताना त्यांनी विविध समित्यांचं काम केलं.

मनोहर जोशी यांची कारकीर्द

मनोहर जोशी यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर टाकूयात.

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला होता.

शिक्षणासाठी ते मुंबईत आले. त्यांनी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं.

मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाली.

१९६७ मध्ये शिवसेनेत प्रवास.

१९६८ मध्ये नगरसेवक बनले. १९७२ मध्ये ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते.

१९७६-७७ मुंबई महापालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं.

१९८९ मध्ये शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले.

१९९०-९१ मध्ये ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

१९९५-९९ दरम्यानच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं.

२००२ ते २००४ मध्ये ते लोकसभा अध्यक्ष होते.

२००६ ते २०१२ या काळात मनोहर जोशी यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलं.

logo
marathi.freepressjournal.in