मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी भरतीला प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष समारंभ उद्या ४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला मोठे मनुष्यबळ मिळणार असून शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता दूर करण्यास मदत होणार आहे.
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता वाढविणे ही काळाची गरज आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून गंभीर आजारांपर्यंतच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही भरती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यातील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील २ हजार ५१४ पदांपैकी १ हजार ४४० पदांसाठी २७ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
भरती प्रक्रियेत ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी अशा एकूण १ हजार ४४० पदांचा समावेश आहे. गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा जवळच उपलब्ध व्हावी, हा प्राधान्यक्रम आहे.
ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांना दिलासा
या नियुक्त्यांचा सर्वाधिक फायदा ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातील नागरिकांना होणार आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागते. डॉक्टरांची उपलब्धता वाढल्याने स्थानिक पातळीवरच तपासणी, निदान आणि उपचार मिळण्यास मदत होईल. अपघात, प्रसूती, सर्पदंश, संसर्गजन्य आजार तसेच अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये वेळेवर उपचार मिळणे शक्य होईल.
१ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे सरकारी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होऊन ग्रामीण जनतेला वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. नवनियुक्त डॉक्टरांनी सेवाभाव आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन ठेवून काम करावे.
प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री