राज्यात १५ हजार पोलिसांची भरती; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या १४ कोटींच्या घरात पोहोचली असून जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र पोलीस दलात १ लाख ९५ हजार पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु राज्याची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे असून आणखी १५ हजार पोलीस शिपायांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या १४ कोटींच्या घरात पोहोचली असून जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र पोलीस दलात १ लाख ९५ हजार पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु राज्याची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे असून आणखी १५ हजार पोलीस शिपायांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली.

या भरतीमध्ये २०२२ आणि २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करत भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात २०२४ दरम्यान रिक्त असलेली तसेच २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे ‘गट क’ संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ‘ओएमआर’ आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

आता भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत, असे निर्देश दिले आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी भूमिका विद्यार्थी समन्वय समितीने मागच्याच आठवड्यात केली होती.

कोणती पदे भरणार?

पोलीस शिपाई - १०,९०८

पोलीस शिपाई चालक - २३४

बँड्समन - २५

सशस्त्र पोलीस शिपाई - २,३९३

कारागृह शिपाई - ५५४

logo
marathi.freepressjournal.in