

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ३९१.०२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला.
एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेला महामंडळाच्या आर्थिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी करताना महामंडळावर मोठा आर्थिक भार येतो. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर आर्थिक अडचणींचे सावट पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका महामंडळाने घेतली होती.