

मुंबई : राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धत तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. ही समिती दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी परिवहन आयुक्त कार्यालयातील अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील पोलीस अधीक्षक सुनील भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक जयंत मुळे आणि परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद तावडे यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे.
आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी
परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे परिवहन उपायुक्त सचिनकुमार गिरी हे समितीचे सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहेत. राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स तसेच नवीन ॲम्ब्युलन्स सेवांबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. समितीने विविध बाबींचा अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या शिफारशींसह अहवाल सादर करायचा आहे. शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत हा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.