आता मंत्रालयात विनाकारण भटकायचे नाही; काम असलेल्या विभागातच प्रवेश; अन्यथा होणार कारवाई

कामानिमित्त मंत्रालयात येण्याआधी घर बसल्या प्रवेश नोंदणी करणे शक्य आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी 'डीजी प्रवेश' ॲप उपलब्ध केला आहे.
आता मंत्रालयात विनाकारण भटकायचे नाही; काम असलेल्या विभागातच प्रवेश; अन्यथा होणार कारवाई
Published on

कामानिमित्त मंत्रालयात येण्याआधी घर बसल्या प्रवेश नोंदणी करणे शक्य आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी 'डीजी प्रवेश' ॲप उपलब्ध केला आहे. मात्र ज्या विभागात तुमचे काम त्याच विभागात प्रवेश मिळणार आहे. काम झाले तर अन्य कुठल्याही विभागात नो एंट्री आहे. कामाव्यतिरीक्त मंत्रालयात कुठेही फिरलात तर थेट कारवाई होणार, असा इशारा राज्य सरकारने दिला.

राज्यभरातील लोक आपल्या कामानिमित्त मंत्रालयात धाव घेतात. मंत्री मंडळाची बैठक असल्यास मोठी गर्दी होते. मात्र मंत्रालयात प्रवेश करण्याआधी पास काढणे गरजेचे असून पास काढण्यासाठी भलीमोठी रांग लागलेली असते. त्यामुळे मंत्रालयात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे, अभ्यागत, अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये यासाठी डीजी प्रवेश ॲप उपलब्ध करण्यात आला आहे, असे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.

वैध प्रमाणपत्र आणा स्वतंत्र रांगेतून प्रवेश मिळवा!

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल, तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे.

अभ्यागतांना शासनमान्य ओळखपत्र बंधनकारक!

मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. डीजीप्रवेश या ऑनलाइन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांकरिता गार्डन गेट येथे ऑनलाइन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीसाठी तसेच मदतीसाठी एक खिडकी उपलब्ध असणार आहे.

असा करा डीजी प्रवेश ॲप डाऊनलोड

'डीजीप्रवेश’ ॲप हे मोबाइल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध आहे. मोबाइलच्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर, तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येते. सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण करता येईल.

logo
marathi.freepressjournal.in