सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार

शासनाच्या धोरणांमुळे सरकारी आणि अनुदानित शाळा बंद पडत असल्याचा आरोप करत ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार
सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

कुडाळ : शासनाच्या धोरणांमुळे सरकारी आणि अनुदानित शाळा बंद पडत असल्याचा आरोप करत ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ‘शिक्षक भारती’चे नेते संजय वेतुरेकर यांनी दिली.

या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे तीन हजार नागरिक सहभागी होणार असल्याचे वेतुरेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शिक्षणप्रेमी, शिक्षण संस्थाचालक, सरपंच, शिक्षक आणि पालकांची संयुक्त बैठक कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वेतुरेकर यांनी आंदोलनाची माहिती दिली.

यावेळी ॲड. कमलाकांत कुबल, शिक्षक नेते राजन कोरगावकर, अंकुश कदम, प्रशांत आडळकर, युगांत चव्हाण यांच्यासह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

हे आंदोलन शिक्षण क्षेत्रातील वाढत्या खासगीकरणाविरोधातील लढा असल्याचे सांगत मंचाच्या वतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘शाळा म्हणजे गावाचा आत्मा’

शाळा ही केवळ इमारत नसून गावाचा आत्मा आहे. हे आंदोलन केवळ शिक्षकांसाठी नसून विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी आहे, असे वेतुरेकर यांनी सांगितले. राज्यभरात सरकारी शाळा बंद होत असताना खासगी शाळांची संख्या वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तालुकानिहाय बैठकांचे आयोजन

धरणे आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यात येत आहेत. या प्रश्नाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे तीन हजार जण मुंबईत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in