मुंबई : गायीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, गायींना आता ‘राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना ‘कामधेनू’ असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळया भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्त्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.
देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन देशी गायींना यापुढे ‘राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
निवडणुकीवेळी गायीला वंदा, नंतर गायीच्या गळ्यात फंदा - वडेट्टीवार
राज्यात दुष्काळ असताना पशुधनाला साधा चारा देण्याची व्यवस्था या सरकारने केली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नव्हता, तेव्हा बोनस देण्याची घोषणा केली पण बोनस दिला नाही. पण आता निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या गायीची आठवण आली आहे. पण गायींना राज्य मातेचा दर्जा देऊन हे सरकार काय साध्य करणार आहे. पशुधन सांभाळण्याची जबादारी सरकार झटकत आहे. महायुतीला निवडणुकीसाठी गाय आठवली. दुष्काळात चारा आणि पाण्याविना तडफडत असताना गाय आठवली नाही, अशी सडकून टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे.