पोषक हवामानामुळे यंदा द्राक्ष निर्यातीत वाढीचा अंदाज; राज्यातील ३ हजार ५५१ शेतकऱ्यांची निर्यातीसाठी नोंदणी

यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच पिकाला पोषक हवामान लाभल्याने द्राक्षवेलींची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे यंदा दर्जेदार उत्पादन हाती येण्याची अपेक्षा असून, द्राक्षांची गुणवत्ता, गोडी, रंग आणि आकार चांगला राहण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम द्राक्ष निर्यातीवर होणार असून, यंदा निर्यातीत वाढ होईल, असा अंदाज महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केला.
पोषक हवामानामुळे यंदा द्राक्ष निर्यातीत वाढीचा अंदाज; राज्यातील ३ हजार ५५१ शेतकऱ्यांची निर्यातीसाठी नोंदणी
पोषक हवामानामुळे यंदा द्राक्ष निर्यातीत वाढीचा अंदाज; राज्यातील ३ हजार ५५१ शेतकऱ्यांची निर्यातीसाठी नोंदणी
Published on: 

लासलगाव : यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच पिकाला पोषक हवामान लाभल्याने द्राक्षवेलींची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे यंदा दर्जेदार उत्पादन हाती येण्याची अपेक्षा असून, द्राक्षांची गुणवत्ता, गोडी, रंग आणि आकार चांगला राहण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम द्राक्ष निर्यातीवर होणार असून, यंदा निर्यातीत वाढ होईल, असा अंदाज महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केला.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक द्राक्षबागांमध्ये अपेक्षित फलधारणा झाली नव्हती. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र, यंदा परिस्थिती तुलनेने अनुकूल आहे. राज्यातील द्राक्ष पिकांची फळछाटणी पूर्ण झाली असून, एप्रिल-मे महिन्यांत पोषक हवामान राहिल्याने वेलींवर सूक्ष्म घडांची चांगली निर्मिती झाली आहे.

यंदा द्राक्ष उत्पादनात पाच ते दहा टक्क्यांची घट होण्याची शक्यता असली, तरी त्याचा निर्यातीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे भोसले यांनी सांगितले. सध्या दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट असतानाही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून द्राक्षपीक चांगल्या प्रकारे जोपासले आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या भागांतील शेतकरी उपलब्ध पाण्याचा वापर करून शेततळी भरून घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पीक काढणीपर्यंत पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे.

द्राक्षांना चांगली गोडी, आकर्षक रंग आणि अपेक्षित आकार मिळण्यासाठी हवामान अनुकूल असल्याने फळांचा दर्जा चांगला राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नोंदणीत सांगली जिल्हा आघाडीवर

युरोपियन तसेच आखाती देशांमध्ये महाराष्ट्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात केली जाते. नाशिक, पुणे, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून प्रामुख्याने निर्यात होते. त्यात नाशिक जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा असतो. यंदाच्या हंगामासाठी निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांकडून बागांची नोंदणी वेगाने केली जात आहे.राज्यातील आतापर्यंत ३ हजार ५५१ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी द्राक्षबागांची नोंदणी केली आहे. यामध्ये सांगली जिल्हा आघाडीवर असून, तेथील ३ हजार १० बागांची नोंदणी झाली आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील ३९४ द्राक्षबागांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन आणि निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)