MPSC Exam Postponed : हिवाळी अधिवेशनाचा ‘अडथळा’; गट-क परीक्षा पुढे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
हिवाळी अधिवेशनाचा ‘अडथळा’; गट-क परीक्षा पुढे
हिवाळी अधिवेशनाचा ‘अडथळा’; गट-क परीक्षा पुढेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासह इतर अनेक कारणे देण्यात आली आहेत. यामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यापूर्वी ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर पार पडेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेचे नियोजन शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी विविध प्रशासकीय आणि स्थानिक बाबींचा आढावा घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल, सणांचा कालावधी, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षित व वेळेत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन ही मुख्य कारणे विचारात घेण्यात आली आहेत

परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील. सर्व परीक्षार्थींनी कोणत्याही अस्वाभाविक अफवांवर विश्वास न ठेवता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in