

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या आता कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्यात येतील, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. 'राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र' (एसएचआरसी) प्रणालीनुसार तयार होणाऱ्या कामगिरी मूल्यांकन व रैंकिंग अहवालांचा यासाठी आधार घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारची 'राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, नवी दिल्ली' ही संस्था देशपातळीवर आरोग्य विभागाला तांत्रिक सहकार्य करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 'राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, पुणे' ही संस्था कार्यरत असून राज्यातील आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढ, आरोग्यविषयक संशोधन व तांत्रिक सहकार्याची जबाबदारी ती पार पाडते.
आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्था तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नियमित मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनाच्या आधारे प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असलेली कामगिरीवर आधारित मासिक रैंकिंग प्रणाली राबविण्यात येते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रणालीच्या कार्यवाही अहवालानुसारच करण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक व परिणामकारक होणार अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या करताना या रैंकिंग आहे.
राज्यातील विविध आरोग्य कार्यक्रमांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध होत असतो. मात्र, नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) माध्यमातूनही निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. यासाठी विभागाने सीएसआर देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
आदेशात काय ?
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, एनएचएम सल्लागार व कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात आणि त्या भेटींचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देशही आरोग्य मंत्र्यांनी दिले. या बैठकीत पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण तसेच अधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या संस्थांबाबतचे सादरीकरण करण्यात आले.