

मुंबई : विस्तारित महात्मा जाेतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सध्या समाविष्ट असलेल्या उपचारांमध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यानुसार ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत १,३५६ उपचारांऐवजी आता ३८ विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण २,३९९ आजारांवर उपचार होणार आहेत. यामुळे बहुतेक आजारांवर उपचार उपलब्ध होणार असल्याने, गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे.
विस्तारित महात्मा जाेतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी गठित समितीने उपचारांमध्ये वाढ करण्यासह इतर शिफारसी केल्या होत्या. विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत एकूण २,३९९ उपचारांपैकी २२३ उपचार शासकीय रुग्णालयांकरिता राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सेवा समायोजनाच्या निर्णयात दुरुस्ती
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करताना सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १४ मार्च २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय यापूर्वी घेतला होता. निर्णयात दुरुस्ती करून सेवांचे समावेशन सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर सेवा समायोजन सार्वनजिक आरोग्य विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांवर करण्यात येणार आहे.
जन आरोग्य योजना, कार्ड वितरणासाठी २०४ कोटींची तरतूद
महात्मा जाेतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण करणे व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.