

मुंबई : राज्यात सुर्य आग ओकत असून पारा ४२ अंश सेल्सिअस वर गेला आहे. मार्च महिन्यापासून तापमानात वाढ झाली असून राज्यात आजवर उष्माघाताचे दोन बळी गेले आहेत. तर ६ संशयित मृत्यू असून उष्माघाताचा त्रास झालेल्यांची गेल्या अडीच महिन्यात २२६ जणांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, १९ मे रोजी दिवसभरात १० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची नोंद झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरिराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले तर ते सुर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून १ मार्च ते १९ मे पर्यंत राज्यभरात उष्माघाताचे एकूण २२६ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून ६ संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. २० मे रोजी एकाच दिवशी १० नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
उष्माघाताची राज्यातील स्थिती
एकूण उष्माघात रुग्ण : २२६
मृत्यू : २
संशयित मृत्यू : ६
१९ मे रोजी एका दिवसातील नवे रुग्ण : १०
सर्वाधिक रुग्ण : औरंगाबाद - ४१
या ठिकाणी उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक उष्माघाताचे ४१ रुग्ण, नंदुरबारमध्ये २४, नाशिकमध्ये १९, बुलढाण्यात १७आणि अमरावतीमध्ये १६ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मात्र अद्याप एकही उष्माघाताचा रुग्ण अथवा मृत्यू नोंदलेला नाही.
देशात उष्णतेचे तांडव
पुढील आठवडाभर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, ओडिशासह १० राज्यांमध्ये कोरडे, उष्ण वारे वाहतील असा अंदाज आहे. या राज्यांमध्ये कमाल तापमान ४५सें. किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवारी उत्तर प्रदेशातील २२ जिल्ह्यांमध्ये ४० सें. किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली. दिल्लीत या वर्षातील उष्णतेच्या लाटेचा चौथा दिवस नोंदवला गेला.