तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; २९ ते ३१ जुलैदरम्यान जोर वाढण्याची शक्यता

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज;  २९ ते ३१ जुलैदरम्यान जोर वाढण्याची शक्यता
तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; २९ ते ३१ जुलैदरम्यान जोर वाढण्याची शक्यताप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ‘एक्स’वरून २९ ते ३१ जुलै या दरम्यानच्या पावसाची माहिती दिली. मुंबई महानगर प्रदेशात ३० आणि ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३० जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.

या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार, २९ जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो, तर ३१ जुलैला खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in