मुंबई : काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा मुंबईसह राज्यात दमदार ‘एंट्री’ केली. रविवारी रात्रीपासून मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने मुंबईसह राज्याला अक्षरश: झोडपून काढले. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाच्या पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले, तर रस्ते व रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुसळधार पावसाचा फटका सोमवारी उपनगरीय लोकल सेवेला बसला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विलंबाने धावत होती. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकादरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच पुढील दोन दिवस मुंबईत ‘यलो’, तर रायगडमध्ये ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आले आहे.
दादर, कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, वांद्रे, अंधेरी, बोरिवली भागात मुसळधार पाऊस पडल्याने रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाली. त्यामुळे लोकलचा वेग कमी करण्यात आला होता. दोन्ही मार्गांवरील लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. रविवार मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात पाणी साचले. सायन, माटुंगा, दादर, चेंबूर, कुर्ला, वडाळा, दादर, परळ आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कुर्ला, सायन, माटुंगा येथील रेल्वे रूळावर पाणी आल्याने रेल्वे विलंबाने धावत होती. मोनोरेलही बंद पडल्याने प्रवासी काही वेळ अडकून पडले. मुसळधार पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांचे हाल झाले.
कसारा, टिटवाळा, कर्जत, बदलापूर, कल्याण, ठाणे, पनवेल, वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल नियोजित वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच डहाणू रोड, विरार, बोरिवली, अंधेरी येथून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी, महत्त्वाच्या स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
राज्यात रविवार रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. सकाळपासूनच सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, बीड आदी जिल्ह्यात जोरदार बॅटिंग केली. मुंबईत सर्वाधिक १३४.४ मिमी, सांताक्रुझ ७३.२ मिमी, पुणे ५४.४ मिमी, रायगड ५१.९ मिमी., बीडमध्ये ३७.२ मिमी. पावसाची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली असून कडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले असून, ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी इमारतींच्या छतावर चढले होते आणि मदतीची याचना करत होते. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी अखेर लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. पुरामुळे जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसभरातील सगळ्या बैठका रद्द करून मंत्रालयातील आपत्कालीन कक्षाला भेट दिली व आपत्कालीन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांच्याकडून पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी शिंदे यांनी संपर्क साधून पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश दिले.
बीडमधील आष्टी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने ४० लोक पाण्यात अडकले. तर पुण्यातील येऊर हवेलीत १५०, लोणी काळभोरमधील ५, इंदापूरमधील १०, अहिल्यानगर पाथर्डी येथील ४ तर करंजी गावातील १५ लोकांचे ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ तुकड्यांच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. तर वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली.
पाऊस ओसरल्यानंतर शेतपिकाचे पंचनामे
अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने १९ महसूल मंडळातील गावांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. पारनेर तालुक्यातील ३, पाथर्डी ३, श्रीगोंदा ८ आणि कर्जत जामखेड तालुक्यातील ५ मंडळांचा यात समावेश आहे. काही भागांत मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. शेतपिकांचे नुकसान झाले असून पाऊस ओसरल्यानंतर पंचनामे केले जातील, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
पवईत दरड कोसळली
शिव भगतानी मनोर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, पंचसृष्टी कॉम्प्लेक्स पवई येथे असलेल्या टेकडीवरून दोन दगड मातीसह खाली असणाऱ्या तीन-चारचाकी वाहनांवर पडले. म्हाडाने येथील धोकादायक दगड मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
बसमार्ग वळवले
खार स्वामी विवेकानंद मार्गावर नॅशनल कॉलेज येथे पावसाचे पाणी भरल्याने वांद्रे तलाव आणि खार पोलीस स्टेशन दरम्यान बसमार्ग ए-१, ४-मर्यादित, सी-३३, ८३, ए-८४, ए-२०२, २५५ मर्यादित, ए-४७३ या क्रमांकाच्या बसेस सकाळी ७ वाजल्यापासून लिंकिंग रोड मार्गाने वळविण्यात आल्या.
पावसाची नोंद
मुंबई शहर - ३२.७७ मिमी
पूर्व उपनगर - ३१.०० मिमी
पश्चिम उपनगर - ३७.५९ मिमी
मुंबईत १२०.१५ टक्के पावसाची नोंद
यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत दमदार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ वेधशाळेत २,७८६ मिमी. म्हणजेच वार्षिक सरासरी १२०.१५ टक्के पाऊस नोंदवला गेला. गेल्या वर्षी याच दिवशी २,५६६ मिमी पावसाची नोंद झाली होती. मुंबईत काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वांद्रे येथे २२७, वरळीत २०४, दादरमध्ये १८८, लोअर परेलमध्ये १८९, डी. वॉर्ड कार्यालय २०१ मिमी तसेच कुलाबा येथे १९७ आणि सीएसएमटी येथे २०५ मिमी पावसाची नोंद झाली.
पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे
पुढील तीन दिवस राज्याला पाऊस झोडपून काढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. कोकणपट्टीत दमदार पावसाची शक्यता असून मराठवाड्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी आणि गुरुवारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व सिंधुदुर्ग वगळता कोकणपट्टीवर तसेच पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.