
पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिमुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे. मुंबईसह, ठाणे, रायगड रत्नागिरीमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे -
सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुटी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी?
पालघरसाठी आज (दि.१८) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या (दि.१९) रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर, ठाणे, मुंबई, रायगडसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार
मुंबईसह राज्यभरात सर्वदूर मुसळधर पावसाने तडाखा दिला आहे. आज (दि.१८, सोमवार) पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला असून पश्चिम आणि मध्य दोन्ही मार्गावरील सेवा उशीराने धावत आहेत. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे ६ गावे पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात येलदरी धरण पूर्ण भरले असून पूर्णा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरमध्येही घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड आहे. राधानगरी धरणाचे ७ स्वयंचलित दरवाजे उघडले असून जिल्हा प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.