हेपेटायटिस-बीचा वाढता धोका! रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ

महाराष्ट्रात नव्याने निदान झालेल्या हेपेटायटिस-बीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, चार वर्षांत ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०२२-२३ मध्ये ९,२६० असलेली रुग्णसंख्या २०२५-२६ मध्ये १८,१२२ वर पोहोचली आहे...
हेपेटायटिस-बीचा वाढता धोका! रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ
हेपेटायटिस-बीचा वाढता धोका! रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : महाराष्ट्रात नव्याने निदान झालेल्या हेपेटायटिस-बीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, चार वर्षांत ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०२२-२३ मध्ये ९,२६० असलेली रुग्णसंख्या २०२५-२६ मध्ये १८,१२२ वर पोहोचली आहे. याच कालावधीत हेपेटायटिस- सीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून, ४७९ वरून ८६४ पर्यंत रुग्णसंख्या वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

हेपेटायटिस-बी आणि सी हे विषाणूजन्य संसर्ग असून, प्रामुख्याने यकृतावर परिणाम करतात. उपचार न केल्यास या संसर्गामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. दोन्ही संसर्ग दीर्घकालीन स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे यकृताचा सिरोसिस आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हेपेटायटिस-बीचा संसर्ग दूषित रक्त, शरीरातील द्रव, असुरक्षित इंजेक्शन तसेच संक्रमित मातेकडून बाळाला होऊ शकतो. तर हेपेटायटिस-सीचा संसर्ग प्रामुख्याने संक्रमित रक्ताच्या संपर्कातून होतो.

हेपेटायटिस-बी प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे, तर हेपेटायटिस सीवर योग्य विषाणूविरोधी औषधांनी उपचार करून बरे करता येते, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

आकडेवारीनुसार, चार वर्षांत हेपेटायटिस-बीच्या नव्या रुग्णांमध्ये जवळपास ९६ टक्के वाढ झाली आहे, तर हेपेटायटिस-सीच्या रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात २०२३-२४ मध्ये हेपेटायटिस-बीचे १२,२५० रुग्ण आढळले, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या १३,७१२ झाली. हेपेटायटिस-सीचे रुग्ण अनुक्रमे ६९५ आणि ७९० होते.

महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणूजन्य हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम जुलै २०१९ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. तपासणी, निदान आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात चार मॉडेल उपचार केंद्रे आणि अन्य ३२ उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

मुंबईतील सायन रुग्णालय, पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती संभाजीनगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चार मॉडेल उपचार केंद्रे आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयाचाही या कार्यक्रमांतर्गत नियुक्त उपचार केंद्रांमध्ये समावेश आहे.

या कार्यक्रमांतर्गत विशेषतः अधिक जोखीम असलेल्या गटांसाठी तपासणी आणि उपचार सुविधा पुरवण्यात येतात. यामध्ये डायलिसिस घेणारे रुग्ण, वारंवार रक्त संक्रमणाची गरज असणारे रुग्ण, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती, इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ घेणाऱ्या व्यक्ती आणि कारागृहातील कैद्यांचा समावेश आहे.

गर्भवती महिलांचीही हेपेटायटिस-बीसाठी तपासणी केली जाते. गर्भवती महिला संक्रमित असल्याचे आढळल्यास, तिच्या नवजात बाळाला संसर्ग रोखण्यासाठी जन्मानंतर २४ तासांच्या आत हेपेटायटिस-बी इम्युनोग्लोब्युलिन आणि हेपेटायटिस-बीची जन्मावेळची लस दिली जाते.

राष्ट्रीय विषाणूजन्य हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार हेपेटायटिस-बी आणि सीचे निदान व उपचार मोफत उपलब्ध करून देते. २०३० पर्यंत हेपेटायटिस-सीला सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने असलेला धोका संपवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

सहा लाख रुग्णांवर उपचार

राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२६ पर्यंत २१ कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, सहा लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. देशभरात सरकारने १,१५३ उपचार केंद्रे स्थापन केली आहेत. मात्र, महाराष्ट्रात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या संसर्गाचे प्रमाण, तपासणीचा विस्तार आणि निदान झालेल्या रुग्णांनी उपचार पूर्ण करून नियमित वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याची गरज याबाबत प्रश्न उपस्थित करते.

महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर

राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीतही महाराष्ट्राच्या स्थानात मोठा बदल झाला आहे. २०२२-२३ मध्ये नव्याने निदान झालेल्या हेपेटायटिस-बीच्या ९,२६० रुग्णांसह महाराष्ट्र राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर होते. मात्र, २०२५-२६ मध्ये १८,१२२ रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. उत्तर प्रदेश ४१,८१९ रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४-२५ मध्येही १३,७१२ रुग्णांसह महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळवले होते. गेल्या चार वर्षांत राज्यात हेपेटायटिस- बीच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे यावरून स्पष्ट होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)