
मुंबई : यंदा मुंबईसह उपनगर जिल्ह्यांना नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठा गौरी विसर्जनाची सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली आहे. यासंदर्भातील शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे.
दरवर्षी दहीहंडी अर्थात गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली जाते. यंदा रक्षाबंधन आणि अनंत चतुर्दशी हे दोन्ही सण शनिवारी येत आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना नियमित सुट्टी असते. त्यामुळे या सुट्ट्या वाया जाऊ नयेत, याकरिता शासनाने यंदा दोन सुट्ट्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे येत्या शुक्रवारी, ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त, तर २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जनानिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत असलेले विविध कोळीवाडे आणि या कोळीवाड्यांमधून मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी नारळी पौर्णिमा पाहता तसेच ज्येष्ठा गौरी विसर्जनाचे पारंपरिक महत्त्व आणि लोकांची मागणी पाहता या दिवशीही सुट्टी जाहीर केल्याचे शासनाचे म्हणणे आहे.