
बदलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात १२५ वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. वसतिगृहे उभारण्याच्या कामासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी मजूर करण्यात आला असून त्यातून राज्याच्या सर्व तालुक्यात वसतिगृहे उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आगमन स्मृतिदिन महोत्सवानिमित्त शनिवारी बदलापुरात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील वसतिगृहाची संजय शिरसाट यांनी पाहणी केली होती. त्यांनंतर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिरसाट म्हणाले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात वस्तीगृह उभारले जाणार असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्याच्या एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून दरवर्षी साडे चौदा कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र इतर दिवशी तिथे कोणत्याही सोयीसुविधा नसतात. त्यामुळे भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आता हे काम सुरू होणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. दुरून दुरून लोक भीमा कोरेगाव पाहण्यासाठी येतील अशा पद्धतीने या परिसराचा विकास केला जाणार असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.
बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी बदलापुरातील सोनिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेल्या १५ वर्षात पूर्ण झालेले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर या स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन कल्याणच्या धर्तीवर स्मारकाचा विकास करण्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, बहुजन युवा नेतृत्व प्रवीण राऊत, माजी नगरसेवक अविनाश मोरे, सोनिया ढमढेरे आदींसह कार्यक्रमाचे आयोजक दिलीप पवार, महेंद्र नवगिरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
बंगला न मिळाल्याची खंत
“लय अन्याय होतोय माझ्यावर” अशा मिश्किल शैलीत अद्याप मलबार हिलमध्ये मंत्र्यांचा बंगला न मिळाल्याची खंत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. मी अंगावर घेतलं तर पूर्णपणे घेतो, कसली फिकीर करत नाही. त्यामुळे मला अजून बंगला मिळाला नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले. दररोज सकाळी १० वाजता एक भोंगा वाजतो, तो वेगळा आणि संजय शिरसाट वेगळा, असे सांगत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला.
मंत्रिपद बाबासाहेबांमुळे
बाबासाहेब पाहता आले नाही, अनुभवता आले नाही पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस मंत्रिपदापर्यंत पोहचला, अशा शब्दात आपले मंत्रिपद ही बाबासाहेबांची देण असल्याचे सांगत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बाबासाहेब नसते तर आरक्षण नसते, आरक्षण नसते तर मी नगरसेवक, आमदार आणि मंत्री झालो नसतो. हा बदल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलाय हे विसरू नये, असे आवाहन संजय शिरसाट यांनी केले.