राज्यभरातील हॉटेल, परमिट रूम आज बंद; सरकारचा एक हजार कोटींचा महसूल बुडणार

इंडियन हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील प्रमुख संघटनांनी एकत्रितपणे सोमवारी १४ जुलै रोजी महाराष्ट्रभर हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यभरातील हॉटेल, परमिट रूम आज बंद; सरकारचा एक हजार कोटींचा महसूल बुडणार
Published on

छत्रपती संभाजीनगर : इंडियन हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील प्रमुख संघटनांनी एकत्रितपणे सोमवारी १४ जुलै रोजी महाराष्ट्रभर हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरांतील ८,००० पेक्षा अधिक बार व एकूण २०,००० हून अधिक रेस्टॉरंट्स सहभागी होणार आहेत. या एकदिवसीय बंदमुळे राज्य शासनाचा अंदाजे १,००० कोटी रुपयांपर्यंत महसूल बुडण्याची शक्यता असून, हजारो ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील आणि सचिव किशोर शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी जयराम साळुंखे, राजेश शेट्टी, सुरेश लालवणी, अशोक जगताप, संजय मनगटे, बाळासाहेब पाटील, मंगेश निकम, महेश कोल्हे, मनोज कामलानी, राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.

या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलीकडील ‘अन्यायकारक कर धोरणांचा परिणाम’ व्यवसायावर आर्थिक ताण वाढल्याने छोट्या व मध्यम हॉटेल व्यावसायिकांवर अडचणींचा डोंगर कोसळला आहे. ही कृती आमच्या अस्तित्वाचा लढा आहे. आम्ही उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भावाना शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दारूवरील व्हॅटमध्ये ५% वरून १०% वाढ करण्यात आली आहे.परवाना शुल्कात १५% वाढ करण्यात आली असून उत्पादन शुल्कात देखील तब्बल ६०% वाढ करण्याच्या निर्णयांमुळे व्यवसायावर होणारा आर्थिक भार असह्य असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने हजारो बार आणि रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

या आंदोलनामुळे ४.५ लाख थेट रोजगार धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पर्यटन आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शहरांवरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार असून, येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक व पर्यटन केंद्र निर्माण करण्याचे स्वप्न व्यक्त केले होते.

असोसिएशनचा इशारा

संवाद झाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल; अगदी हिंसक स्वरूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही, तर हे आंदोलन पुढे अधिक आक्रमक आणि दीर्घकाळ टिकणारे होऊ शकते, असा इशारा देत हॉटेल व्यावसायिक एकत्रित लढ्यास सज्ज झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in