
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील. या निकालाची प्रत विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्याचप्रमाणे ‘डिजिलॉकर ॲप’मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली.