

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात तब्बल २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. या निकालात सर्वाधिक ९४.१४ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे, तर सर्वात कमी ८४.१४ टक्के निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालावर मुलींनी वर्चस्व कायम ठेवले आहे.
बारावी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७९ आहे. विज्ञान शाखेत सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के निकाल लागला. निकालाची टक्केवारी कला शाखेत सर्वात कमी आहे.
सर्व विभागीय मंडळातून एकूण ६ लाख ७४ हजार ८७४ मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी ६ लाख २८ हजार ६९९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ आहे. तर राज्यभरातून सर्व शाखांमधून त्यापैकी ७ लाख ५८ हजार १८४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ६ लाख ५८ हजार १४४ मुले उत्तीर्ण झाले असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.८० टक्के आहे.
मार्कशीट, प्रमाणपत्र एकत्र मिळणार
यापूर्वी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका निकालांनंतर १० दिवसांत मिळत होते, तर प्रमाणपत्र सहा महिन्यांनंतर मिळत असे. मात्र यंदापासून पहिल्यांदाच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच वेळी देण्यात येणार आहे. निकालानंतर १५ व्या दिवशी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र शाळेमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे सुमारे ३ कोटी रुपयांची बचत झाली आहे. आधारप्रमाणे निकाल आणि प्रमाणपत्रावर नाव असणार असून त्यानुसार वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असेल.
१०० कर्मचारी निलंबित
परीक्षा केंद्रांवर परीक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणाची गंभीर दाखल घेत मंडळाने तब्बल १०० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये अमरावती विभागातील तब्बल ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याखालोखाल छत्रपती संभाजी नगर विभागातील ४३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच मंडळाने कठोर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे नागपूर विभागातील ४ आणि लातूर विभागातील ३ असे एकूण १०० कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
मंडळनिहाय निकाल
कोकण - ९४.१४ टक्के
मुंबई - ९०.०८ टक्के
पुणे - ९१.२५ टक्के
कोल्हापूर - ८९.९७ टक्के
अमरावती - ९०.९२ टक्के
नाशिक - ९०.७२ टक्के
लातूर - ८४.१४ टक्के
नागपूर - ८८.६७ टक्के
छ. संभाजी नगर - ८८.६८ टक्के