

राज्यातील जुन्या अर्थात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली. राज्य परिवहन विभागाकडे HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आतापर्यंत जवळपास १ कोटी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, यापैकी केवळ ७३ लाख वाहनांना HSRP प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. अद्याप २७ लाखांहून अधिक वाहनधारकांना एचएसआरपी पाट्यांची प्रतीक्षा असून ही प्रक्रिया पुढील काही आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
एचएसआरपी (HSRP) लावण्याची सुरुवातीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ होती, त्यानंतर अनेकदा मुदत वाढवण्यात आली आणि अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली होती. मात्र, पुन्हा मुदतवाढीबद्दल अद्याप कोणतीही नवीन घोषणा केली नसल्यामुळे, नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओकडून लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. "पुढील मुदतवाढीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसल्यामुळे, नियमांचे पालन लवकर व्हावे यासाठी अंमलबजावणी सुरू केली जाईल," असे एका वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. वर्षाच्या अखेरीस अर्जांमध्ये अचानक जास्त वाढ झाल्यामुळे अधिकृत फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट मिळण्यात विलंब झाल्यामुळे प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तपासणी आणि दंडाची शक्यता
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून लवकरच तपासणी सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या वाहनांवर HSRP नसेल, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात तात्काळ दंडाऐवजी नियमांची अंमलबजावणी आणि नागरिकांनी HSRP बसवून घ्यावे, यावर अधिक भर दिला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, ज्या वाहनधारकांनी आधीच एचएसआरपीसाठी अर्ज केला असेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
HSRP नसताना वाहन चालवल्यास काय? आवश्यकता का? दंड किती?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP बंधनकारक आहे. वाहनांची ओळख अधिक अचूक व्हावी आणि वाहनचोरीला आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत सर्व वाहनांमध्ये HSRP आधीपासूनच बसविलेल्या असतात. त्यामुळे ज्या वाहनांवर आधीच नियमांनुसार HSRP प्लेट आहे, त्या वाहनमालकांना प्लेट बदलण्याची गरज नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
- तात्काळ चलन (चालान)
तपासणी सुरू झाल्यानंतर रस्त्यावर वाहन तपासणीदरम्यान HSRP नसल्यास तात्काळ चलन आकारले जाऊ शकते. हा दंड जागेवरच भरावा लागेल आणि टाळण्याचा पर्याय राहणार नाही.
- कायदेशीर कारवाईची शक्यता
वारंवार HSRP शिवाय वाहन चालवताना आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामुळे दंडाची रक्कम वाढू शकते (प्रथम उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम १००० रुपयांपर्यंत असू शकते. तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास ही रक्कम ५००० ते १०००० रुपयांपर्यंत असू शकते) आणि वाहन नोंदणी निलंबित होण्याचीही शक्यता आहे.
- वाहनाच्या पुनर्विक्री मूल्यात घट
HSRP नसलेले वाहन कायदेशीर निकषांनुसार अपूर्ण मानले जाते. त्यामुळे अशा वाहनाचे पुनर्विक्री मूल्य मोठ्या प्रमाणात घटू शकते आणि खरेदीदारही असे वाहन घेण्यास टाळाटाळ करू शकतात.
HSRP का आवश्यक? अर्ज कुठे?
एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक
एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत सर्व नवीन वाहनांमध्ये HSRP आधीपासून बसविलेल्या असतात
आधीच HSRP असलेल्या वाहनांना बदल करण्याची गरज नाही
वाहतूक विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर एचएसआरपी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करता येईल