
बेळगाव : गेल्या सहा ते सात दशकांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण बेळगावला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सोमवारी महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात कर्नाटक सरकारकडून सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच कर्नाटक सरकारकडून वॅक्सिन डेपो मैदानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वॅक्सिन डेपो मैदानात तैनात करण्यात आला आहे. मराठी भाषिक एकत्र जमू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे, तर दुसरीकडे मराठीभाषिक जनता आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महामेळाव्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेते. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असल्याचे दिसत आहे. संचारबंदी आणि पोलिसांना तैनात केले तरी आम्ही वॅक्सिन डेपो मैदानात एकत्र जमणार असल्याचा इशारा मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मैदान परिसरात येऊन पाहणी केली. मेळाव्यासाठी कशाप्रकारे नियोजन करता येईल याची खात्री पदाधिकाऱ्यांनी केली आहे.