महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद; माझ्यावर कर्नाटक पोलिसांनी काठी उगारली, या बड्या नेत्याने केले आरोप

बेळगाव येथे आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांकडून अडवणूक
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद; माझ्यावर कर्नाटक पोलिसांनी काठी उगारली, या बड्या नेत्याने केले आरोप
Published on

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद हा दिवसेंदिवस आणखी चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावमधील महामेळावा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निघाले होते. मात्र, कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना रोखले. यावेळी हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक पोलिसांनी माझ्यावरही लाठीमार केल्याचा आरोप केला.

कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. "बेळगावमधील मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाहीविरोधी आहे. मराठी भाषिकांवर दडपाशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही," असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. यावेळी सुमारे एक-दीड तास कर्नाटक पोलीस आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरु होता.

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, "माझ्या डोळ्यासमोर असलेल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असताना मी अधिवेशनाला कसा जाऊ शकतो? आम्ही सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी महामेळाव्याला बेळगावमध्ये जात होतो. मात्र, मेळाव्याची परवानगी नाकारली, मंडपदेखील काढले, स्पीकर फेकले या सर्व गोष्टी निषेधार्ह आहेत. मी त्यांचा जाहीर निषेध करतो." दरम्यान, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या धोरणामुळे सर्व स्तरांतून टीका होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in