

कोल्हापूर : केंद्र सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. साखरेची एमएसपी आणि इथेनॉल दरवाढ करावी तसेच ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करायचा असल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवरील कोगनोळी टोलनाका आणि कर्नाटकमधील हत्तरगी टोलनाका येथे हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या दिल्याने हा प्रमुख महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
साखरेचा किमान विक्रीदर प्रतिकिलो ५० रुपये आणि सी-हेव्ही इथेनॉल दर प्रति लिटर ७० रुपये करावा. तसेच सरकारला लवकर हंगाम सुरू करायचा असल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रूपये अनुदान द्यावे, या तीन प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली
कोगनोळीसह हत्तरगी टोल नाक्यावरही हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे पुणे-बंगळूरू महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिसांकडून सीमा परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आंदोलनस्थळी मुक्काम करण्याची तयारी
जोपर्यंत केंद्र सरकार आमच्या मागण्यांवर लेखी निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत महामार्गावरुन उठणार नाही. केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मुक्काम करण्याची तयारी केली आहे. कागल आणि निपाणी तालुक्यातील गावांमधून शेतकऱ्यांसाठी भाकरी आणि पिठले गोळा केले जात आहे. टोलनाक्यावरच जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.