

मुंबई : महाराष्ट्र राज्य परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात सातत्याने देशात आघाडीवर राहिले असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी तो एक विश्वासार्ह ठिकाण म्हणून उदयास आले आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यपालांनी सांगितले की, ‘महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले असून, देशातील अग्रगण्य राज्य बनण्याच्या दिशेने तो ठामपणे प्रगती करत आहे. रस्ते, रेल्वे, बंदरे, ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांत महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य आहे. शेती, उद्योग, व्यापार आणि वाहतूक क्षेत्रांतही राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. राज्याच्या आर्थिक विकासात मुंबईने निर्णायक भूमिका बजावली आहे,’ असे देवव्रत म्हणाले.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडते. पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे शिक्षण, उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची केंद्रे म्हणून उदयास येत असून, त्यामुळे महाराष्ट्राचा संतुलित आणि सर्वसमावेशक विकास वेगाने होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
डिजिटल युगात सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीचे राज्य असून, उद्यमशील आणि कष्टाळू नागरिक हीच राज्याची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हा भारताच्या आर्थिक विकासाचा एक शक्तिशाली इंजिन असून, संत परंपरा, सामाजिक जाणीव आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा ही त्याची वेगळी ओळख आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भौगोलिक आणि धोरणात्मक लाभांमुळे राज्य औद्योगिक विकासासाठी अत्यंत अनुकूल असून, भक्कम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि स्थिर धोरणांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण ठरला आहे, असे ते म्हणाले.
लोकशाहीचे यश हे सरकार आणि जनतेमधील विश्वासाच्या मजबूत नात्यावर अवलंबून असल्याचे सांगत, एकता, बंधुता आणि सक्रिय नागरिक सहभागातून लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारतातील लोकशाही व्यवस्था केवळ जगातील सर्वात मोठीच नाही, तर ती मूल्याधिष्ठित आणि समृद्धही आहे. आपली शासनरचना केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन स्तरांवर आधारित आहे. या विकेंद्रित व्यवस्थेचा उद्देश सत्तेचे केंद्रीकरण नव्हे, तर शेवटच्या नागरिकापर्यंत सेवा पोहोचवणे हा आहे,’ असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचाही आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल
भारतासोबतच महाराष्ट्रही विकास, सुशासन आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. शासन आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नांतून आत्मनिर्भर महाराष्ट्राचा संकल्प साकार होत आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.