

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी विधान परिषदेत जाहीर केला. त्यानुसार १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता या पदासाठी मतदान होणार आहे.
या जागेसाठी शिवसेना शिंदे गटात चुरस निर्माण झाली असून माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार मनीषा कायंदे यांच्यात जोरदार स्पर्धा लागली आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. विधान परिषदेत सध्या भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. मात्र, महायुतीमधील सत्तावाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसार उपसभापतीपद पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटातच या पदासाठी मोठी चुरस लागली आहे. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्या या शर्यतीत सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तसेच पक्षांतर्गत वर्तुळात कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांच्याही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
पक्षीय बलाबल
पक्ष - संख्या
भाजपा - ३५
शिवसेना (शिंदे) - ११
राकाँपा (अजित) - १०
काँग्रेस - ५
शिवसेना (उद्धव) - ६
राकांपा (शरद) - २
अपक्ष - ४
रिक्त - ५
एकूण - ७८
निवडणूक बिनविरोध?
महाविकास आघाडीकडे (मविआ) विधान परिषदेत आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधक या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवून ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, अशी रणनीती आखत आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली, तर १ जुलै रोजीच नवीन उपसभापतींच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.