महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे; विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्याने महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांच्या उमेदवारांविरोधात मंगळवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे काही मतदारसंघात अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे; विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली
महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे; विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली
Published on: 

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी युती आणि आघाडी धर्माला तिलांजली देत अनेकांनी बंडाचा झेंडे हातात घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्याने महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांच्या उमेदवारांविरोधात मंगळवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे काही मतदारसंघात अधिकृत उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारपर्यंत या पाचही मतदारसंघात १६७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ९ ऑक्टोबर अशी आहे. या मुदतीत बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जाणार आहेत. उमेदवारी माघारीची मुदत संपल्यानंतर पाचही मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

पाच जागांसाठी निवडणूक

७८ सदस्यीय विधान परिषदेत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक होत आहे. पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, पुणे विभाग शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत संबंधित विभागातील नोंदणीकृत पदवीधर आणि शिक्षकांना मतदानाचा अधिकार आहे.

येथे झालीय बंडखोरी

पुणे पदवीधर

या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या सचिन सानप यांनी अर्ज भरला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने येथील हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

नागपूर पदवीधर

भाजपने येथे सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात माजी आमदार अनिल सोले, तसेच भाजपचे रमण सेनाड यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेसने अभिजित वंजारी यांना पुन्हा संधी दिली आहे. तरीही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नितेश कराळे यांनी अर्ज भरला आहे.

औरंगाबाद पदवीधर

येथून महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाने सतीश चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अर्ज भरला आहे. त्याशिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलीप घुगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

पुणे शिक्षक

या मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मंगेश चिवटे यांना रिंगणात उतरवले आहे. तसेच भाजपचे पंढरपूरचे नेते बी. पी. रोंगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. येथून काँग्रेसने जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे.

अमरावती शिक्षक

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने येथे आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली असली तरीही शिवसेना ठाकरे गटाच्या दत्तात्रय लहाने यांनीही अर्ज दाखल केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in