महाराष्ट्रात कुष्ठरोगाचा धोका कायम; नऊ वर्षांत १.५७ लाख कुष्ठरुग्ण, शोधमोहिमेत ४४ हजारांहून अधिक रुग्णांचा शोध

कुष्टठरोग मुक्त महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जात असतानाही गेल्या नऊ वर्षांत तब्बल १ लाख ५७ हजार २६९ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आले आहे.
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचा धोका कायम; नऊ वर्षांत १.५७ लाख कुष्ठरुग्ण, शोधमोहिमेत ४४ हजारांहून अधिक रुग्णांचा शोध
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचा धोका कायम; नऊ वर्षांत १.५७ लाख कुष्ठरुग्ण, शोधमोहिमेत ४४ हजारांहून अधिक रुग्णांचा शोधप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : कुष्टठरोग मुक्त महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जात असतानाही गेल्या नऊ वर्षांत तब्बल १ लाख ५७ हजार २६९ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे कुष्ठरोग शोधमोहिमेसह एसीडीआरएसमध्येच ४४ हजार ३६७ रुग्ण आढळल्याची धक्कादायक आकडेवारी राज्य सरकारच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातून उपलब्ध झाली आहे.

राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासह संबंधित रुग्णाला वेळीच उपचार मिळावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१५-१६ ते २०२५-२६ या कालावधीत नऊ वर्षांत १.५७ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कुष्ठरोग शोधमोहिमेत ४४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने कुष्ठरोग शोधमोहिमेचे आकडे चिंताजनक आहेत. कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३० ऑक्टोबर २०२५ पासून कुष्ठरोगाला ‘अधिसूचित आजार’ घोषित केले आहे. त्यामुळे शासकीय, खासगी व अशासकीय संस्था तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना निदान झालेल्या प्रत्येक कुष्ठरुग्णाची माहिती शासनाला देणे बंधनकारक झाले आहे.

कुष्ठरोगावर औषधोपचाराची प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध असली तरी नवीन रुग्णांचा शोध, त्यांचे वेळेवर निदान आणि उपचाराखाली आणणे हेच रोगप्रसार रोखण्याचे प्रमुख आव्हान आहे.

आशा सेविकांना असे मिळते मानधन

कुष्ठरोगावरील उपचार पूर्ण करणाऱ्या रुग्णांना तसेच नवीन रुग्ण शोधणाऱ्या आशा स्वयंसेविकांना शासनाकडून मानधन दिले जाते. विकृतीविना नवीन रुग्ण शोधल्यास आशांना २५० रुपये, तर विकृती असलेला नवीन रुग्ण शोधल्यास २०० रुपये मानधन दिले जाते. सांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास ६०० रुपये आणि असांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास ४०० रुपये मानधन देण्यात येते.

शस्त्रक्रियेसाठी ५ हजारांचे अनुदान

कुष्ठरोगामुळे निर्माण झालेल्या विकृतींवर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यासाठी ५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. स्वयंभू कुष्ठवसाहतींमध्ये रुग्णांच्या जखमांचे ड्रेसिंग करणाऱ्या ड्रेसरला वाढीव मानधन देण्याचाही शासन निर्णय आहे.

नऊ वर्षांत आढळलेले रुग्ण

२०१५-१६ मध्ये मोहिमेत केवळ १६६ रुग्ण सापडले होते. मात्र त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढून २०१६-१७ मध्ये ४,१३४, २०१७-१८ मध्ये ५,०७३, २०१८-१९ मध्ये ५,२६८, २०१९-२० मध्ये ६,११६, २०२२-२३ मध्ये ६,७३१ आणि २०२३-२४ मध्ये ६,७४४ इतकी झाली. २०२५-२६ मध्येही मोहिमेदरम्यान ६,३०९ रुग्ण आढळले असून ही आकडेवारी चिंताजनक आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in