
मुंबई : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो. पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावे, असे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
एसएनडीटी महिला विद्यापीठ, पाटकर सभागृह येथे सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी मान्यता रद्द झालेल्या २ हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ज्या सार्वजनिक वाचनालयाला ५०, ७५ व १०० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी, यंदा ग्रंथ प्रदर्शन माध्यमातून जवळपास ४० कोटी पुस्तकांची विक्री झाली. १० लाख वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. यामध्ये ४ लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथालय चळवळ टिकावी आणि पुढे वाढत जावी यासाठी ‘एक तास शांतता… पुणे वाचत आहे’, ‘१५ दिवसात पुस्तक वाचून परीक्षण लिहिणे’ यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये ३ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण सुद्धा लिहिले, असेही सांगितले.
पालकमंत्र्यांनी निधी द्यावा - निलम गोऱ्हे
राज्यातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. पालकमंत्र्यांच्या निधीतील एक टक्के निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावा, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.