
मुंबई : पुढील दोन महिन्यांत निवडणुकीशी संबंधित तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडेल त्यादिवशी ‘ईव्हीएम मशीन’चा पुरेसा साठा कुठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला सतावत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे ६५ हजार ‘ईव्हीएम मशीन’ आहेत. परंतु, राज्यात एकाच दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ लाख ५० हजार ‘ईव्हीएम मशीन’ची गरज भासणार आहे. त्यामुळे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचे नियोजन असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दैनिक ‘नवशक्ति'ला बोलताना सांगितले.
राज्यातील २९ महानगरपालिकेत चार ते पाच वर्षांपासून प्रशासकीय राज आहे, तर २४८ नगर परिषदांचीही मुदत संपुष्टात आली असून याठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १३ मे रोजी राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दीड लाख ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त ६५ हजार ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त मशीनसाठी मागणी करण्यात येणार आहे. मात्र, मशीन उपलब्ध न झाल्यास तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
गरज असेल तेथेच डॉक्टर
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत यंदा डॉक्टरांचा अधिकचा सहभाग नसेल. परंतु, ज्याठिकाणी गरज आहे त्याठिकाणी डॉक्टर, रुग्णवाहिका तैनात करण्यात येतील.
- दिनेश वाघमारे (आयुक्त, राज्य निवडणूक आयोग)
अशी पार पडणार निवडणूक प्रक्रिया
प्रभाग रचना, प्रभाग रचनेबाबत हरकती सूचना मागवणे, त्यानंतर सूचना हरकतीवर सुनावणी, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर आरक्षण लॉटरी, मतदारयादी तयार करणे आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस या निवडणुकीच्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत.
ऑक्टोबरमध्ये होणार निवडणुका?
प्रभाग रचना ही २०११ च्या जनगणनेनुसार होणार असली तरी सद्य:स्थितीत लोक स्थलांतरित झाले असल्यास काही ठिकाणच्या प्रभागरचनेत बदल होईल, संपूर्ण प्रभाग रचनेसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एकूणच निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, असे संकेत वाघमारे यांनी दिले. मुंबई महानगरपालिका, जिल्हा पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.